जागतिक महिला दिनानिमित्त संगमेश्वर पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा गौरव

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

संगमेश्वर/दिनेश अंब्रे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता राहुल कोकाटे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील कोष्टी मॅडम, पडवळ मॅडम, क्रांती सावंत मॅडम, भोसले मॅडम, तांबडे मॅडम यांच्यासह इतर सर्व महिला सहकाऱ्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. संगमेश्वर परिसरात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पाडव्यापासून ते फाल्गुन मधील शिमगोत्सवापर्यंतच्या सर्व सण-उत्सवांमध्ये महिला पोलिसांचा बंदोबस्त आणि त्यांचे सहकार्य मोलाचे असते, या शब्दांत सौ. कोकाटे यांनी त्यांचे आभार मानले.सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. अशा कठीण परिस्थितीतही या महिला पोलीस कर्मचारी दिवस-रात्र आपले कर्तव्य चोख बजावत असून, त्यांचे हे कार्य संपूर्ण संगमेश्वरकरांसाठी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सौ. कोकाटे यांनी केले. संगमेश्वरच्या ग्रामस्थांना महिला पोलिसांचे अशाच प्रकारचे सहकार्य भविष्यातही लाभावे आणि त्यांना त्यांच्या पुढील सेवेसाठी अधिक प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून महिला पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *