अंधार, डोंगर-दऱ्यांशी झुंज देत मध्यरात्री आंबोळगड परिसराचा वीजपुरवठा सुरळीत

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर : आंबोळगड व पडवणे परिसरातील वीजपुरवठा शनिवार (दि.7 मार्च) रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ‘नाटे फिडर’ बंद पडल्याने खंडित झाला होता. उंच डोंगर, खोल दरी, दाट झाडी आणि पूर्ण अंधार, अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. महावितरणच्या रत्नागिरी उपविभागातील राजापूर-1 शाखा कार्यालय, आडिवरे येथील कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मध्यरात्रीपर्यंत झटत वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला. या कामगिरीमुळे दोन गावांतील सुमारे 350 ग्राहकांना दिलासा मिळाला.

पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच प्रधान तंत्रज्ञ पालकर मिस्त्री यांनी तातडीने तपासणी केली असता तेंडुलकर बाग परिसरात उच्च दाब वाहिनीचे दोन पोल कोसळल्याचे आढळले. हा भाग डोंगर-दऱ्यांनी वेढलेला आणि अत्यंत दुर्गम असल्याने दुरुस्तीचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या परिस्थितीत महावितरण रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे आणि उपकार्यकारी अभियंता जमीर तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आडिवरे शाखेचे अभियंता तुकाराम भिसे व जैतापूर शाखेचे अभियंता विशाल गावकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाला गती दिली. डोंगर आणि उताराच्या जागेमुळे पोल उभे करणे अत्यंत कठीण होते, तरीही आडिवरे शाखेतील जनमित्र तसेच कंत्राटी कर्मचारी यांनी जिद्दीने काम सुरू ठेवले.

रात्रीच्या अंधारात नवीन पोल उभे करण्यासाठी खड्डे खोदणे, अवजड पोल उभे करणे तसेच त्यावर चॅनेल, इन्सुलेटर यांसारखी साहित्य बसविणे ही सर्व कामे युद्धपातळीवर करण्यात आली. याशिवाय पडलेल्या जुन्या पोलवरील तारा काढून त्या सावधगिरीने नव्या पोलवर खेचून बसविण्याचे आव्हानात्मक कामही यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांनीही मोठे सहकार्य केले. पडवणे आणि आंबोळगड येथील ग्रामस्थांनी डोंगराळ भागातून पोल वाहून नेण्यात मदत केली. विशेष म्हणजे ग्रामस्थ खडपे यांनी आपल्या वाहनाचे हेडलाईट सुरू ठेवून कामाच्या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था केली तर इतर ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात मदत केली. या प्रकाशाच्या आधारावर अखेर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात यश आले.

काम पूर्ण झाल्यानंतर नाटे येथील ‘हॉटेल कुलस्वामिनी’ चे भाई राजापकर यांनी रात्री उशिरा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे उदाहरण घालून दिले. दिवसाढवळ्या करणेही अवघड वाटणारे काम मध्यरात्रीच्या अंधारात पूर्ण करून महावितरणची टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला असून या जिद्दीच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *