रत्नागिरी: रत्नागिरी बार असोसिएशन व विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने, महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकिलांच्या विविध स्पर्धा रत्नागिरी शहरातील वेगवेगळ्या क्रीडा संकुलामध्ये घेण्यात आल्या.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव व रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक रत्नागिरी बारच्या महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी केले.जास्तीत जास्त महिलांनी प्रॅक्टिस करतानाच न्यायाधीश बनण्यासाठी प्रयत्न करावे, रत्नागिरी बार असोसिएशनकडून त्यांना उत्तम मार्गदर्शन लाभेल, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत असताना आपले वकिलीचे कामकाज तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सर्वांनी एकत्रित येऊन स्वतःचा आनंद द्विगुणित करावा, यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे प्रतिवर्षी आयोजन करण्याचा रत्नागिरी बार असोसिएशनचा हा प्रयत्न असतो, असेही त्या म्हणाल्या.विविध स्पर्धांचा तपशील असा – बुद्धिबळ स्पर्धा – एकूण 67 स्पर्धक सहभागी. ॲड. चैताली नागवेकर विजयी तर ॲड. गौरी सावंत या उपविजेत्या झाल्या. बॅडमिंटन स्पर्धेत ॲड. श्रद्धा कांबळे विजयी, देवयानी राजेशिर्के उपविजयी झाल्या. पाककला स्पर्धेतील शाकाहारी पदार्थ बनविण्यामध्ये ॲड. मैथिली जाधव यांनी प्रथम तर ॲड. अश्विनी साळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. मांसाहारी पदार्थ बनविण्यामध्ये ॲड. अपेक्षा सकपाळ यांनी प्रथम व ॲड. मैथिली जाधव यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून हॉटेल व्यावसायिक सौ. ममता नलावडे व सौ. पल्लवी माने यांनी काम पाहिले.स्पर्धात्मक फनी गेम्समध्ये ॲड. प्रतीक्षा भानुशाली यांनी प्रथम, तर ॲड. श्वेता मोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पॉन्टेनिअस स्पीच स्पर्धेमध्ये ॲड. अपूर्वा राणे, ॲड. अनुष्का बापट, ॲड. कार्तिकी शिंदे व ॲड. प्रतिभा पवार यांनी यश मिळविले.जलद चालण्याच्या स्पर्धेमध्ये ॲड. प्रणिता चव्हाण यांनी प्रथम तर ॲड. तन्वी गद्रे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कॅप्टन ॲड. प्रणिता चव्हाण यांचा संघ विजयी झाला तर कॅप्टन ॲड. ममता मुद्राळे यांचा संघ उपविजेता झाला. पंच म्हणून ॲड. मच्छिंद्र आंब्रे यांनी व स्कोअरर म्हणून ॲड. सरोजिनी भाटकर यांनी काम पाहिले. रांगोळी स्पर्धेमध्ये ॲड. श्वेता शिवगण यांनी प्रथम, रंजना झोरे यांनी द्वितीय तर ॲड. नेहा नलावडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व स्पर्धांसह संपूर्ण उपक्रमाचे नीटनेटके नियोजन रत्नागिरी बारच्या महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी केले. हा संपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये त्यांना रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव ॲड. रत्नदीप चाचले, खजिनदार ॲड. अवधूत कळंबटे यांचे उत्तम सहकार्य लाभले.स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम.अंबाळकर व रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.







