कर्तव्याच्या कठोर वाटेवर माणुसकीचा ओलावा, संगमेश्वर पोलीस ठाण्यात योगिता आणि विश्वास बरगळे यांचा दुहेरी आनंदोत्सव साजरा

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

खाकी वर्दीतील पती-पत्नीचा जन्मदिवस आणि लग्नवाढदिवस एकाच दिवशी; पोलीस परिवाराने जपली कौटुंबिक जिव्हाळ्याची परंपरा

संगमेश्वर शहर /एजाज पटेल : समाजाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करून अहोरात्र राबणारा घटक म्हणजे पोलीस. अंगावर खाकी वर्दी चढवली की, त्या व्यक्तीला ना सण उरतो ना वार. कडाक्याची थंडी असो, अंगाची लाहीलाही करणारे ऊन असो वा मुसळधार पाऊस, जनसुरक्षेसाठी हे खाकी वर्दीतील योद्धे सदैव रस्त्यावर तैनात असतात. अशाच धावपळीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात माणुसकीचा एक सुखद आणि भावूक क्षण संगमेश्वर पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला. निमित्त होते, येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल पती-पत्नी योगिता बरगळे आणि विश्वास बरगळे यांच्या आयुष्यातील एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाचे.९ मार्च हा दिवस बरगळे दाम्पत्यासाठी आनंदाचा खजिनाच घेऊन आला. या दिवशी या पती-पत्नीच्या यशस्वी आणि सुखी वैवाहिक जीवनाला १२ वर्षे पूर्ण झाली. या १२ वर्षांच्या प्रवासात खाकी वर्दीतील जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी संसाराचा गाडाही तितक्याच समर्थपणे ओढला आहे. पण निसर्गाचा आणि नशिबाचा एक अनोखा योगायोग म्हणजे, याच दिवशी योगिता बरगळे यांनी आपल्या आयुष्याच्या ३४ व्या वर्षाचा टप्पा ओलांडून ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. म्हणजेच स्वतःचा वाढदिवस आणि लग्नाचा १२ वा वाढदिवस असा हा दुहेरी सुवर्णयोग एकाच दिवशी जुळून आला होता.पोलीस दलात काम करताना अनेकदा आपल्या कुटुंबासोबत साधे दोन क्षण आनंदाचे घालवणेही दुरापास्त होते, तिथे अशा विशेष दिवशी सुट्टी मिळणे तर लांबच. मात्र, हीच उणीव संगमेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भरून काढली. ‘सणवाराला नशिबी ना घर, ना कुटुंब’ अशी स्थिती असताना, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे वातावरण ९ मार्च रोजी एखाद्या घरासारखे झाले होते. आपल्या या सहकाऱ्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत वेळ काढला. त्यांनी एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र येत, पोलीस ठाण्यातच केक कापून या दाम्पत्याचा वाढदिवस आणि लग्नवाढदिवस साजरा केला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि शुभेच्छांच्या वर्षावात पोलीस ठाण्यातील शिस्तबद्ध वातावरण काही क्षणांसाठी आनंदाने न्हाऊन निघाले.पोलीसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अनेकदा कठोर असतो. मात्र, या वर्दीच्या आडही एक हळवे हृदय असते, त्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही कोणाच्या तरी आपुलकीची ओढ असते, हे या सोहळ्याने दाखवून दिले. आपल्या सहकाऱ्यांनी दाखवलेले हे निस्सीम प्रेम, दिलेला सन्मान आणि दाखवलेली आत्मीयता पाहून योगिता आणि विश्वास बरगळे हे पती-पत्नी अत्यंत भावूक झाले होते. ३५ व्या वर्षातील पदार्पण आणि संसाराची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिळालेली ही शाबासकी पाहून या दाम्पत्याचे डोळे पाणावले होते.आपल्या सहकाऱ्यांनी कोणतीही उणीव भासू न देता, पूर्ण उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा केलेला हा दिवस बरगळे दाम्पत्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरली आहे. सदैव जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या या खाकी वर्दीतील योद्ध्यांच्या आयुष्यातील हा सुखद क्षण संगमेश्वर परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला असून, पोलिसांच्या या ‘कौटुंबिक’ नात्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *