GRAMIN SEARCH BANNER

लांजा : अल्पवयीन मुलाकडून चिमुरड्या बालिकेवर अत्याचार

Gramin Varta
1k Views

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यात एका अल्पवयीन मुलाकडून चिमुरड्या बालिकेवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

२३ मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पीडित बालिका आपल्या घराशेजारी खेळत असताना, आरोपी मुलाने तिला फूस लावून स्वतःच्या घरात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबीयांनी विचारपूस केली असता हा सर्व दुर्दैवी प्रकार समोर आला.

याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी तात्काळ लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.या गंभीर गुन्ह्याबाबत पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अर्थात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात शांतता राखावी, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3375567
Share This Article