लांजा: लांजा आणि राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले असून अनेक ग्रामीण भागांत विजेचे खांब कोसळल्याने आणि वाहिन्या तुटल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या संकटकाळात जनतेला दिलासा देण्यासाठी आमदार किरण सामंत स्वतः मैदानात उतरले असून, त्यांनी महावितरणच्या दुरुस्ती कामाची प्रत्यक्ष पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रशासकीय पातळीवर तातडीच्या सूचना देत त्यांनी वीज यंत्रणा युद्धपातळीवर कार्यान्वित केली आहे.
मुसळधार पाऊस, चिखल आणि धोकादायक परिस्थिती असतानाही महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कामाची गांभीर्याने दखल घेत आमदार सामंत यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. केवळ पाहणी करून न थांबता, त्यांनी भर पावसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. “जनता तुमच्या कामाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असली तरी, काम करताना स्वतःच्या जीवाची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या,” अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना धीर दिला. आमदारांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आणि त्यांनी केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
अनेकदा केवळ आदेश देणारे लोकप्रतिनिधी पाहिले आहेत, मात्र प्रत्यक्ष फिल्डवर येऊन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणारा असा लोकप्रतिनिधी प्रथमच पाहत असल्याची भावना यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी आमदार सामंत यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रशासनाशी साधलेला समन्वय यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडूनही त्यांचे कौतुक होत आहे. सध्या लांजा-राजापूर तालुक्यातील दुर्गम भागात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आमदार स्वतः या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.






