मुंबई: मुंबईमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेतील अल्पकालीन चर्चेदरम्यान शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्वी मुंबईत पाणी साचले किंवा एखादी दुर्घटना घडली की सर्रास ठाकरेंवर आरोप केले जात होते, मात्र यंदा मुंबई ठाकरेंमुळे नाही तर केवळ पावसाच्या अतिवृष्टीमुळे तुंबली आहे, अशी धारदार चपराक त्यांनी लगावली. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईची कशा प्रकारे काळजी घेतली जात होती, हे यंदाच्या पावसाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असे म्हणत त्यांनी पावसाचे आभार मानले.
विधानसभा नियम १०१ अन्वये झालेल्या चर्चेत भास्कर जाधव यांनी राज्यभरातील पावसाच्या नुकसानीचा पाढाच वाचला. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पूल कोसळले, इमारतींना तडे गेले आणि अनेक गावे जगापासून तुटली आहेत. मुंबईत मॅनहोल्स उघडे राहिल्याने दुर्दैवी मृत्यू ओढवले आहेत, तर अवघ्या चार दिवसांत राज्यात एक हजार झाडे उन्मळून पडली आहेत. वसई-विरारसह अनेक भागांत वीज आणि मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांच्या खाण्यापिण्याचे वांधे झाले असून, दूध पुरवठाही खंडित झाला आहे. अधिवेशन सुरू असताना जनतेच्या या भीषण समस्यांकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी मिसिंग लिंक प्रकल्पावरूनही सरकारला घेरले. या पुलाचे डिझाईन कॅनडा, चाचण्या डेन्मार्क, अग्निशमन सुरक्षा स्पेन, केबल उत्पादन मलेशिया, आरेखन तैवान आणि तज्ज्ञ सिंगापूरचे, असे हे जागतिक स्वरूप पाहून, हा प्रकल्प सर्व देशांत फिरायला गेला होता का, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. तसेच, महामार्गावर ठिकठिकाणी अनावश्यक स्पीडब्रेकर आणि रम्बलर बसवले जात आहेत. हे सर्व केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी केले जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी सरकारकडे नक्की काय तयारी आहे, याचे उत्तर त्यांनी सभागृहात मागितले.
