रत्नागिरी: येथील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानाने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य ठरला.
मंडळातर्फे शताब्दी महोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती.
स्पर्धेला रोख रक्कम, चषक आणि मेडल्स अशी एकूण २५००० रुपयांची बक्षिसे होती. स्पर्धेत एकूण १०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यातील २० खेळाडू फिडे गुणांकनप्राप्त खेळाडू होते. स्पर्धेला चेसडोटस अॅकॅडमीचे तांत्रिक सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेच्या उद्घाटनाला मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे आणि विश्वस्त मंदार खेर यांच्यातील डावाने सुरुवात झाली. मंडळाचे सचिव राहुल काळे, सचिन करमरकर, सीए मंदार गाडगीळ, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर व विवेक मुसळे या प्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये फारसे धक्कादायक निकाल न लागल्याने पुढील चारही फेऱ्यांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. १२ वर्षांच्या आयुष रायकरने अतिशय सुरेख खेळाचे प्रदर्शन करत शेवटचे तिन्ही डाव अनुभवी व ज्येष्ठ फिडे मानांकित खेळाडूंसोबत जिंकले व सर्वांचीच वाहवा मिळवली. स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पहिल्या बोर्डवर खेळणारा वरद पेठे पहिल्या सहा फेऱ्या जिंकून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात होता. आपला एक सामना बरोबरीत सोडवलेल्या यश गोगटेने वरदला शेवटच्या फेरीत हरवत विजेतेपदावर सातपैकी साडेसहा गुण मिळवत शिक्कामोर्तब केले. अनिकेत रेडीजने अखेरच्या फेरीत उत्कंठावर्धक लढतीत तेजस्वर कांबळेचा पराभव करीत विजय मिळवला व आपले तिसरे स्थान निश्चित केले.
स्पर्धेला पंच म्हणून विवेक सोहनी व मानस सिधये यांनी काम पहिले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष शशिकांत काळे, अरुण करमरकर, मंडळाचे सचिव राहुल काळे, सीए मंदार गाडगीळ, स्पर्धा प्रमुख मनोहर केळकर, सचिन करमरकर, सीए मंदार जोशी, गुरुप्रसाद जोशी, प्रफुल्ल पेठे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तसेच वैद्य मंगल कार्यालयाच्या वैद्य कुटुंबीय यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेचा विस्तृत निकाल असा :
खुला गट : यश गोगटे, वरद पेठे, अनिकेत रेडीज, आयुष रायकर, प्रणव मुळ्ये, आयुष मयेकर, सौरीश कशेळकर, साईप्रसाद साळवी, विवेक जोशी, साहस नारकर, तेजस्वर कांबळे, प्रवीण सावर्डेकर, यश खेर, सोहम रुमडे, अपूर्व बंदसोडे.
सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू – सुनील शिंदे.
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू – सई प्रभुदेसाई, जिज्ञासा सावंत
वयोगट ३६-५५ वर्षे – मंगेश मोडक, जितेंद्र पटेल
वयोगट १६-३५ वर्षे – श्रीहास नारकर, मोहम्मद सोलकर
पंधरा वर्षांखालील गट – निधी मुळ्ये, नंदन दामले, आर्यन धुळप, पद्मश्री वैद्य, सिद्धेश चव्हाण
बारा वर्षांखालील गट – अलिक गांगुली, अथर्व साठे, रुद्र जोशी, ओम तेरसे, राघव पाध्ये
नउ वर्षांखालील गट – आरव निमकर, शुभम कोठारकर, देवांग वैद्य, राजस नाईक
रत्नागिरी : टिळक आळी गणेशोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य
