रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहरातील रस्ते बघून आता ‘स्मार्ट सिटी’चा खिताबच खड्ड्यांनी जिंकला की काय, अशी शंका येते. रस्ते कुठे आहेत हे GPS शिवाय सापडत नाही, कारण सगळीकडे फक्त खड्डेच खड्डे. काही ठिकाणी एवढे मोठाले खड्डे आहेत की तिथं छोटा बप्पा विसर्जनही करू शकेल!
गेल्या अनेक वर्षांपासून “थांबा, लवकरच सुधारणा होईल” या आश्वासनांच्या खड्ड्यांत नागरिक पडत आहेत. पण आता श्रावण सुरू झालाय, बाप्पा येणार, गणेशोत्सवाचा जल्लोष होणार… आणि सगळ्या स्वागतासाठी शहरात खड्ड्यांची फुल डेकोरेशन उभी आहे!
रामआळी, मारुती आळी, एसटी स्टँड, काँग्रेस भुवन, टिळकआळी – नाव घ्या आणि खड्डा शोधा! कारण शोध फार लागणार नाही – कारण खड्डाच दिसतो! रामआळी तर इतकी ‘खडकेदार’ झाली आहे की ग्राहकांनी उगाच खिशातले पैसे घेऊन बाहेर पडू नये, असं व्यापाऱ्यांचं सांगणं आहे — कारण ग्राहकच तिकडे येईनासे झालेत!
साळवी स्टॉपपासून मारुती मंदिरापर्यंत एक बाजूचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं आहे. दुसरी बाजू मात्र अजूनही प्रशासनाच्या “लवकरच होईल” या टेम्प्लेट उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. नेमकं काम का थांबलं? कुणालाच माहिती नाही — किंवा माहिती द्यायला कुणी तयार नाही!
या सर्व गोंधळामुळे वाहनचालकांना रोजची ‘अॅडव्हेंचर ट्रिप’ मोफत मिळते. हेल्मेट, सीट बेल्टपेक्षा आता ‘शॉक अब्झॉर्बर’ मजबूत असणे हीच शहरातील वाहतूक सुरक्षेची नवी व्याख्या झाली आहे.
आता तरी खड्डे बुजवा! गणपती बाप्पा येणार आहेत. निदान त्यांची स्वारी तरी निर्विघ्न व्हावी, हीच रत्नागिरीकरांची अपेक्षा आहे — खड्ड्यांवरचा गंध नाही, पण खड्ड्यांचा दरवळ मात्र कायम आहे!
रत्नागिरीतील रस्त्यांची भयानक स्थिती, गणपतीचे आगमन खड्ड्यातून होणार?
