जलसंपदा विभागाचे 4 सामंजस्य करार
मुंबई : लांजा तालुक्यातील कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी 6,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जलसंपदा विभागाच्या वतीने चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पांमुळे राज्यात एकूण ३१,९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ६,४५० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती आणि सुमारे १५,००० रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
लांजातील प्रकल्पासह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि अमरावती येथील प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या करारामुळे राज्यातील पंप स्टोरेज पद्धतीच्या जलविद्युत प्रकल्पांना गती मिळणार असून, नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्राने गतिमान पद्धतीने पंप स्टोरेज धोरण राबवले असून, प्रस्तावित प्रकल्पांची संख्या, गुंतवणूक आणि वीजनिर्मितीच्या क्षमतेच्या बाबतीत राज्य देशात आघाडीवर आहे. २०३० पर्यंत राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक वीज नवीकरणीय स्रोतांमधून मिळवण्याचे उद्दिष्ट असून, सौरऊर्जा आणि पंप स्टोरेजद्वारे वीज निर्मितीवर भर दिला जात आहे.
राज्य शासनाने २० डिसेंबर २०२३ रोजी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर प्रकल्प उभारणीचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार आजच्या करारांमध्ये ग्रीनको, ऋत्विक, अदानी आणि वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन या कंपन्यांचा समावेश आहे.
या करारांनंतर राज्यातील पंप स्टोरेज प्रकल्पांची एकूण संख्या ५० झाली आहे. यामधून ६८,८१५ मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती, ३.७५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १.११ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
पाणी वापराच्या संदर्भात, या प्रकल्पांसाठी प्रथम भरावासाठी १९.२९ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, दरवर्षी पुनर्भरणासाठी ३.२४ टीएमसी पाणी लागणार आहे. यामुळे राज्य शासनाला महसूल म्हणून एकूण अंदाजे २,८९० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
लांजातील कासारी-मुचकुंदी जलविद्युत प्रकल्पासाठी 6,700 कोटींचा निधी
