GRAMIN SEARCH BANNER

मुंबईसह राज्यातील काही भागातून मोसमी पावसाची माघार

Gramin Varta
138 Views

मुंबई : मोसमी पावसाने राजस्थानमधून तीन दिवस लवकर परतीचा प्रवास सुरू केला. महाराष्ट्रातून मात्र पाच दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा, अकोलापर्यंतचा पश्चिम विदर्भातून माघार घेतली.

याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, बिहारमधील काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्याचे शुक्रवारी हवामान विभागाने जाहीर केले. मोसमी वाऱ्यांची परतीची सीमा शुक्रवारी अलिबाग, अहल्यानगर, अकोला, जब्बलपूर आणि वाराणसी या भागात होती. दरम्यान, राज्याच्या इतर भागातून पुढील तीन – चार दिवसांत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबलेला होता. त्याच कालावधीत राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यानंतर मागील काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. परतीच्या पावसाचे वेध लागले असताना राज्यातील काही भागात ‘ऑक्टोबर हीट’च्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा, अकोलापर्यंतचा पश्चिम विदर्भातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. गेल्या काही दिवसांत मुंबईत फारसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात वाढ झाली होती. मुंबईत शुक्रवारी उन्हाचा ताप, तसेच उकाडाही सहन करावा लागला.

दरम्यान, राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा मात्र दोन दिवस लवकर १४ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. त्यानंतर २ ऑक्टोबरला पुन्हा काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला. महाराष्ट्रातून पवासाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातून सरासरी ५ ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला. पोषक वातावरण राहिल्यास १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.

मुंबईत आत्तापर्यंत किती पाऊस

१ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२६३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३११२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत कुलाबा केंद्रात २०९४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २३१८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईतून साधारण ८ ऑक्टोबर रोजी मोसमी पाऊस माघारी जातो. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी मोसमी पाऊस माघारी गेला होता. २०२३ आणि २०२२ मध्ये २३ ऑक्टोबर, २०२१ मध्ये १४ ऑक्टोबर, २०२० मध्ये २८ ऑक्टोबर तर २०१९ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी मोसमी पाऊस माघारी गेला होता.

Total Visitor Counter

2648126
Share This Article