लांजा : तालुक्यातील हर्चे-बेनी बुद्रुक रस्त्यावर काटले गावाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गजानन गुरव (वय ४१) हे त्यांच्या होंडा सीबी युनिकॉर्न (क्र. एमएच ०८/ए.एस/०४२८) या दुचाकीवरून हर्चेकडून बेनी बुद्रुकच्या दिशेने जात होते. त्यांच्या मागे श्रद्धा संजय पाथरे (वय ५२) या बसल्या होत्या. त्याच वेळी समोरून अक्षय नंदकुमार बेनकर (वय ३०) हा त्याच्या होंडा एक्स्ट्रीम (क्र. एमएच ०८/बी.ए/४०७६) या दुचाकीवरून हर्चेच्या दिशेने येत होता. त्याच्या मागे सहस रघुनाथ लोहार (वय ५५) हे बसले होते.
काटले येथील वळणावळणाच्या रस्त्यावर अक्षयने आपल्या दुचाकीवरील नियंत्रण गमावले. त्याने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवून समोरून येणाऱ्या गुरव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये राजीव गुरव, श्रद्धा पाथरे, अक्षय बेनकर आणि सहस लोहार यांचा समावेश असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस नाईक नासीर शब्बीर नावळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय बेनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लांजामध्ये दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक; चार जखमी
