राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्याला धार्मिक स्थळावरील चोरीच्या घटनेने हादरवले आहे. तालुक्यातील करक येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी मंदिरातील सुमारे २५ ते ३० घंटांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी काल रात्री ९ ते आज सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात ही चोरी आल्यानंतर त्यांनी तातडीने मंदिर प्रशासनाला आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
या प्रकरणी मंदिर समितीच्यावतीने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. मंदिरातील इतर कोणत्याही वस्तूंची चोरी झाली आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमुळे धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून, लवकरच चोरट्यांना पकडावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.