योजनेचा आतापर्यंत 4.05 कोटी महिलांना लाभ
मुंबई : महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी (पीएमएमव्हीवाय) विशेष नावनोंदणी करण्याची मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
घरोघरी जनजागृती करण्यासह – नावनोंदणी करण्याच्या या मोहिमेचा उद्देश अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांद्वारे सर्व पात्र गर्भवती आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचणे आणि या योजनेअंतर्गत त्यांची वेळेवर नोंदणी सुनिश्चित करणे हा आहे.पीएमएमव्हीवाय योजना गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार आणि आरोग्यदायी वर्तणूकीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते, त्यासोबतच या योजनेचा उद्देश बालिकांप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. पीएमएमव्हीवाय ही योजना मातांना पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वी आणि नंतर विश्रांती घेतल्यामुळे होणाऱ्या वेतन नुकसानाची अंशतः भरपाई म्हणून रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देते. या योजनेच्या सुरुवातीपासून 31जुलै 2025 पर्यंत, 4.05 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या बँक/पोस्ट खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मातृत्व लाभापोटी (किमान एक हप्ता) 19,028/-रुपये कोटी इतका निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना मिशन शक्तीची उप-योजना ‘सामर्थ्य’ याअंतर्गत येणारी केंद्रसरकार पुरस्कृत योजना आहे, जी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने थेट आर्थिक मदत प्रदान करते. मिशन शक्ती योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीएमएमव्हीवायअंतर्गत, पहिल्या मुलासाठी दोन हप्त्यांमध्ये 5,000 रुपये रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जाते आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर एका हप्त्यात 6,000 रुपये रोख दिले जातात. या योजनेचे उद्दिष्ट गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमध्ये आरोग्यदायी वर्तनाची जाणिव निर्माण करणे आणि देशभरात माता आणि बाल आरोग्यक्षेत्रात उत्तम परिणाम घडवून आणणे हे आहे. मार्च 2023 मध्ये नवीन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सॉफ्टवेअरचा शुभारंभ झाला आहे; (पीएमएमव्हीवायसॉफ्ट) त्याचा वापर करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी त्यांच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत योजनेची अंमलबजावणी करतात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची विशेष नोंदणी मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली
