GRAMIN SEARCH BANNER

अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करणार- नितेश राणे

सिंधुदुर्ग: कणकवलीतील मटका जुगारावर गुरुवारी(दि.२१) आम्ही धाड टाकली. आता अवैध दारी धंदे, अंमली पदार्थांचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी असोत किंवा अन्य शासकीय कर्मचारी या सर्वाना निलंबित करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

ते शुक्रवार (दि. २२) कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, मी पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील मटका, जुगार, गांजा या अड्ड्यांवर कारवाई करावी असे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. पण पोलिस प्रशासन कारवाई करत नसल्यानेच मला धाड टाकावी लागली. सावंतवाडी विश्रामगृहाच्या मागे सिगारेट मधून कोण गांजा विकतोय, कोण कोण गांजा ओढताहेत. खारेपाटण तपासणी नाका, कणकवलीतील हरकुळ बुद्रूक किंबहुना जिल्ह्यातील सर्वच भागात अवैध धंद्यांमध्ये कोण सहभागी आहेत ? या व्यावसायिकांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कशी साथ देतेय याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर या सर्वांवर आम्ही कारवाई करणार आहोत.

मला हप्ता मिळत नाही, हप्ता वाढवून पाहिजे आहे असे अनेक आरोप माझ्यावर झाले. पण मी गप्प राहिलो. कारण पोलिसांना कारवाईची संधी द्यायची होती. पण पोलिसांनी कारवाई केली नसल्याने मला कणकवली येथील मटका जुगारावर धाड टाकावी लागली. यापुढेही अवैध धंद्यांवर पोलिस, महसूल तसेच अन्य यंत्रणांनी कारवाई न केल्यास प्रत्येक आठवड्याला सर्व अवैध व्यावसायांवर धाड टाकून ते व्यवसाय कायमचे बंद करून टाकणार आहे.

सिंधुदुर्गातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस, महसूल आणि इतर विभाग काय करतात ? वाळू चोरी, गांजा, गोवा बनावटीची दारू यांना कोण पाठबळ देतंय ? हे सर्व मला माहित आहे. मी सगळ्यांना कारवाईसाठी वेळ देतोय. त्यांनी कारवाई करावी. कोणी निलंबित झाला तर मला दोष देऊ नये. गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई केली जाते. पण, गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असे का? यापुढे हे चालणार नाही.

पुढे राणे म्हणाले, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत. त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. ते खपवून घेतले जाणार नाही. अधिकारी, कर्मचारी यांनी देश सेवेसाठी आपण पद ,नोकरी स्वीकारली आहे.याचे भान ठेवावे आणि काम करावे. सगळेच अधिकारी भ्रष्ट नाहीत. पण, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वच अधिकारी बदनाम होत आहेत. पोलिस खाते ज्या अंतर्गत येते त्या गृहखात्याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. अधिकाऱ्यांनी विनाकारण त्यांना बदनाम करु नये. अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी असेही मंत्री नितेश राणे यावेळी म्हणाले.

Total Visitor Counter

2475258
Share This Article