रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडात आता एक महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. वाटद खंडाळा खून प्रकरणात मृत्यू झालेल्या सीताराम वीर याला आरोपींनी केलेल्या मारहाणीनंतरचे फोटो पोलिसांना मिळाले आहेत. या फोटोंमध्ये वीर याच्या चेहऱ्यावर आणि पायावर मारहाण झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसत असल्याने दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.
मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात संशयित असलेला मुख्य आरोपी दुर्वास पाटील व त्याच्या दोन साथीदारांनी चौकशीदरम्यान कळझोंडी येथील सीताराम वीर आणि राकेश जंगम यांचाही खून केल्याची कबुली दिली होती. यापैकी सीताराम वीर याचा खून २९ एप्रिल २०२४ रोजी झाल्याचे उघडकीस आले होते. सीताराम वीर याचा खून झाल्याचे तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आल्याने पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान होते. विशेष म्हणजे, घटनेनंतर नातेवाईकांनी परस्पर वीर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यामुळे पोलिसांना मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता होती.
दरम्यान, वीर याला मारहाण झाल्यानंतर दुर्वासने त्याला त्याच्या घरी आणले होते. याच वेळी एका व्यक्तीने सीताराम वीर यांचे फोटो काढून ठेवले होते. हे निर्णायक फोटो आता पोलिसांच्या हाती आले आहेत. या फोटोंमुळे सीतारामला बेदम मारहाण झाली होती, हे शाबित करण्यास मदत मिळणार असल्याने तपासात हे मोठे यश मानले जात आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुर्वास पाटील याचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध होते. ही बाब सीतारामला समजली आणि त्याने भक्तीचा मोबाईल नंबर मिळवून तिला सतत फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. भक्तीने याची तक्रार प्रियकर दुर्वासकडे केली. याच रागातून सीतारामला अद्दल घडवायचा इरादा दुर्वासने केला. २९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सीताराम दुर्वासच्या खंडाळा येथील ‘सायली बार’मध्ये दारू पिण्यासाठी आला होता. ही संधी साधून दुर्वासने त्याचा साथीदार विश्वास पवार आणि राकेश जंगम यांच्या मदतीने सीतारामला काठीने, हाताच्या थापटाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत सीतारामचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दुर्वासने त्याच अवस्थेत सीतारामला रिक्षाने त्याच्या घरी नेले आणि नातेवाईकांना दारू पिण्याच्या नादात अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध झाला, अशी खोटी कहाणी सांगितली. आता हे फोटो हाती आल्यामुळे खुनाचा गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीने पोलिसांची बाजू भक्कम झाली असून पुढील तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.