मुंबई : देशभरात ड्रग्जविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी याप्रकरणी मोठी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्ब्ल ४०० कोटी रुपयांच्या MD ड्रग्जवर कारवाई केली आहे.
तसेच पोलिसांनी कर्नाटकातील म्हैसूरमध्येही ड्रग्ज प्रकरणात छापे टाकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत एका मोठ्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी १८८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले असून या ड्रग्जची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी कर्नाटक मधून मुंबई शहरात MD ड्रग पुरवठा करत होते.
दरम्यान, साकीनाका पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात ड्रग्ज पुरवठा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने तपस सुरु केला असून तपासदरम्यान त्यांना म्हैसूरची माहिती मिळाली. आणि त्यावर धाड टाकल्यानंतर हे ३९० कोटीचे आमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत.
म्हैसूरमध्येही छापे
ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी म्हैसूरमध्येही छापा टाकला आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनीही मुंबई पोलिसांच्या या कारवाईबाबत निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, “मला वाटतं मुंबई पोलिसांनी कोणाला तरी पकडलं आहे, एकतर तस्कर किंवा वापरकर्ता. त्यांनी ते म्हैसूरपर्यंत शोधून काढले आहे. तसेच ज्या व्यक्तीला त्यांनी पकडले आहे त्याने ते म्हैसूरहून आल्याचे विधान दिले आहे आणि ते त्याचा शोध घेत असून त्याला ताब्यात घेतले आहे.”
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा पुढे म्हणाले “मी म्हैसूर आयुक्तालयाला अतिशय कडक सूचना दिल्या आहेत. तसेच, राज्यभरात, प्रत्येक एसपीला आता संवेदनशील बनवण्यात आले आहे आणि अशा गोष्टी घडू नयेत यासाठी प्रत्येक आयुक्तालयाला अतिशय कडक सूचना देण्यात आल्या आहेत.”
पुण्यात ड्रग्ज पार्टीवर कारवाई
रविवारी पुणे शहरात ‘ड्रग्ज पार्टी’चे प्रकरण समोर आले. पोलिसांच्या छाप्यानंतर ७ जणांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व सातही आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! ४०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश
