GRAMIN SEARCH BANNER

अंकुश खरवतेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या शाळेतील पदवीधर शिक्षक अंकुश राघोजी खरवतेकर यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी जाहीर केली आहे. श्री. अंकुश खरवतेकर यांनी ‘The   Effects of Teaching techniques from ‘ELIPS’ (Maharashtra English Language Initiative for Primary Schools) project on English language acquisition of Primary school students in Ratnagiri district – A Critical Study’ या विषयावरील संशोधन विद्यापीठाला सादर केले होते. यासाठी त्यांना चेंबूर सर्वंकष महाविद्यालय, चेंबूर मुंबईच्या प्राध्यापिका डॉ. कुसुम चौधरी यांनी मार्गदर्शन केले. अंकुश खरवतेकर हे रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळांमध्ये अनेक वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत असून महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंतआयोजित केलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणांमध्ये त्यांनी राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर  तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने ब्रिटिश कौन्सिलच्या सहाय्याने राबविलेल्या ‘एलिप्स’या इंग्रजी विषयाच्या प्रकल्पामध्ये त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून शिक्षकांना इंग्रजी अध्यापनाची अनेक नावीन्यपूर्ण तंत्रे परिचित करून दिली होती. या तंत्रांचे प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात उपयोजन केल्यास विद्यार्थ्यांच्या एकूण इंग्रजी भाषा कौशल्यांचा कितपत विकास होतो? भाषा संपादणुकीची पातळी किती वाढते? याचा अभ्यास त्यांनी प्रस्तुत संशोधनांमध्ये केला होता.

खरवतेकर यांचे मूळ गाव खरवते( राजापूर)  असून जिल्हा परिषद शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे.  प्राथमिक शाळेपासूनच आपली इंग्रजी विषयाबद्दलची आवड त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या यशाबद्दल  शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून तसेच नातेवाईक, मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Total Visitor Counter

2475129
Share This Article