लांजा : तालुक्यातील धावणेवाडी येथे पॅरालिसिसने ग्रस्त असलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचा घरात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष मोहन सागवेकर (वय ५४, सद्य:स्थिती रा. आशीर्वाद निवास, धावणेवाडी, ता. लांजा, मूळ रा. कळसवली पाटीलवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सागवेकर हे गेले सात ते आठ वर्षांपासून पॅरालिसिसच्या (लकवा) आजाराने ग्रासलेले होते. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना चहा-नाश्ता देऊन खुर्चीवर बसवले होते. त्यानंतर अचानक खुर्ची पडल्याचा आवाज आला. कुटुंबियांनी धाव घेऊन पाहिले असता, संतोष सागवेकर खाली पडलेले होते आणि त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती.
त्यांना तात्काळ लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून संतोष सागवेकर यांना १६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.
या घटनेची नोंद लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
लांजात पॅरालिसिसने ग्रासलेल्या प्रौढाचा घरात पडून मृत्यू
