रत्नागिरी : गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी येथील एका पाण्याच्या प्रवाहात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सतीश सखाराम पुजारी (वय ५१, रा. विलेपार्ले, मुंबई, मूळ रा. बेहेरेवाडी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश पुजारी हे २४ ऑगस्ट रोजी गणपती सणासाठी बेहेरेवाडी येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर, दुपारी १२.३० च्या सुमारास ते कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी त्यांचा सर्वत्र शोध सुरू केला. अखेर अशोक बेहेरे यांच्या आंब्याच्या बागेजवळील काळीकॉड येथील एका पाण्याच्या प्रवाहात त्यांचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला. तात्काळ त्यांना एका खाजगी रुग्णवाहिकेतून पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांचा मृतदेह रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. तेथेही डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २४/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ नुसार करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुजारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी आलेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू
