चक्क ९६ तास स्केटिंग करत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक
देवरुख: नऊ वर्षांचा कु. रेयांश पृथा पराग बने याने अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कोलकात्याच्या रवींद्र सरोवर लेक येथे १९ ते २३ जूनदरम्यान झालेल्या ९व्या अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेत रेयांश याने सुवर्णपदकांची हॅट्रिक करत देवरुखसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यश मिळवले आहे.
स्पर्धेतील ‘रोड १ लॅप’, ‘१०० मीटर रोड’, आणि ‘५०० मीटर रोड’ या तिन्ही टप्प्यांमध्ये रेयांश याने अप्रतिम कामगिरी करत तीनही सुवर्णपदक आपल्या खिशात घातली. रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. ८ ते १० वयोगटातून महाराष्ट्राचे नेतृत्व करत कु. रेयांश याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबईतील भांडुप उपनगरात राहणारा रेयांश हा युरो स्कूल, ऐरोली येथील विद्यार्थी असून वयाच्या पाचव्या वर्षीच त्याने बेळगाव येथे ९६ तास स्केटिंग करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली होती. आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ आणि कोलकाता येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्याने एकूण ३३ सुवर्ण, १२ रौप्य व ८ कांस्य पदकांची घवघवीत कमाई केली आहे.
रेयांश हा शिवसेना भांडुपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे. तसेच महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने शेठ व माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा तो नातू आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर रेयांश सोमवार, दि. २४ जून रोजी पहाटे २ वाजता कोलकात्याहून मुंबईसाठी रवाना होणार असून सकाळी ६ वाजेपर्यंत तो मुंबई विमानतळावर दाखल होईल. त्याच्या स्वागतासाठी कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते आणि अनेक भांडुपकर उपस्थित राहणार आहेत.