कसबा येथील युवा मूर्तिकार अविराज कानसरे यांची अभिनव कल्पना
सचिन यादव / धामणी
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. चित्रशाळांमध्ये मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात असताना संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील अविराज कला केंद्रात मात्र एक आगळावेगळा प्रयोग आकार घेत आहे.
युवा मूर्तिकार अविराज कानसरे यांनी यंदा गणपती बाप्पांना खऱ्या कापडी फेटा, धोतर व शेला परिधान करून सजवण्याची नवी संकल्पना साकारली आहे. या अनोख्या रूपातील गणपती मूर्ती पाहून भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.
अविराज यांच्या कारखान्यात पीओपी व शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील भाविकांमध्ये त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. अविराज यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून वडील व काकांबरोबर मूर्ती घडवण्याचे बाळकडू घेतले. त्यानंतर या कलेला त्यांनी आधुनिक रंगसंगती व नवनवीन प्रयोगांची जोड दिली.
मुंबईत एका कारखान्यात गणेश मूर्तींना खरे कपडे परिधान करण्याचा प्रयोग पाहून अविराज प्रेरित झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या गावात हा प्रयोग करून एक मूर्ती साकारली. मित्र व भाविकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या पद्धतीच्या मूर्तींना मागणी वाढू लागली.
खरी वस्त्रे चढवण्याची प्रक्रिया:
प्रथम मूर्तीला रंगकाम केले जाते. त्यानंतर कोणत्या रंगाचा फेटा, धोतर किंवा शेला चांगला उठून दिसेल, याचा विचार करून बाजारातून कापड आणले जाते. या कपड्यांना आधी सोनेरी काठ शिवले जातात आणि मग ते मूर्तीवर चिकटवले जातात. मूर्तीला बैठकीसाठीसुद्धा खरे कापड वापरले जाते. एका मूर्तीला वस्त्रांचा साज चढवण्यासाठी साधारण तीन तास लागतात.
यंदा अविराज कानसरे यांच्या कारखान्यात अशा सुमारे २५ मूर्ती तयार होत आहेत.
भाविकांचे समाधान:
“मी पंधरा वर्षांपासून अविराज यांच्या मूर्ती आणतोय. त्यांची रंगसंगती, रेखणी आणि आपल्या पसंतीनुसार मूर्ती बनवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे,” असे गणेशभक्त स्वप्निल पाटेकर यांनी सांगितले.
स्वतः अविराज म्हणतात, “जगाला आकार देणारा बाप्पा माझ्या हातून साकार होतोय हेच माझ्यासाठी मोठं समाधान आहे. या कामात नफा-तोटा काही नाही; हे फक्त बाप्पाचं रूप आपल्या हातून घडतंय, हीच खरी कमाई आहे.”
कोकणात गणपती बाप्पा आता फेटा-धोतीत
