खेड : गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी रोटरी अकॅडमी महाड येथे जेईई, नीट आणि सीईटी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन, मा. श्री. बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर मा. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, मा. सौ. नीता शेठ, मा. श्री. प्रदीप शेठ आणि मा. सौ. अपूर्वा देसाई यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केले.
या सत्कार सोहळ्यातील गुणवंतांमध्ये जेईई मेन्स परीक्षेत ९८.९४ पर्सेनटाईल मिळवलेली अर्चना पाटील, तसेच ९० पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण मिळवलेले इशा गायकवाड, सार्थक सोनकर, श्रावणी भिलारे, मृण्मयी चितळे यांचा समावेश होता. नीट प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या यशस्वी निकालामध्ये ९८.७७ पर्सेनटाईल गुण मिळविलेला यश माळी, ९७.५२ पर्सेनटाईल गुण मिळवलेली तन्वी जैन तसेच ८५ पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण मिळवलेले इफ्रा मसिहुद्दीन, समृद्धी कुडाळकर, तेजस भगत, स्वराली लाड यांचा गौरव करण्यात आला. एम.एच.टी. सीईटी पीसीबी परीक्षेत ९० पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण मिळवलेले स्मित काकडे, गार्गी जंगम, सिया पोतदार, कस्तुरी पवार यांचाही सत्कार झाला, तर एम.एच.टी. सीईटी पीसीएम परीक्षेत ९० पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आदित्य कदम, प्रसाद गोगावले यांचा सन्मान करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते घड्याळ, स्टेथोस्कोप व फ्रेम देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवर मा. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना स्वप्न पाहून ती अभ्यास व जिद्दीच्या बळावर पूर्ण करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मेहनतीची तपश्चर्या केल्यास त्यांना सहज यश मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ‘मी हे करू शकतो’ असा आत्मविश्वास असायला हवा. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून, मोबाइलपासून दूर राहिल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले. रोटरीचे महाडवर उपकार असून, त्यांच्या माध्यमातून महाडमधील मध्यम वर्गातल्या मुलांना रोटरी अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मान्यवर मा. सौ. नीता शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “आपल्या प्रयत्नांमध्येच यश लपलेले असते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर शंका घेऊ नका. चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पालक सौ. माळी व सौ. गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असते असे सांगितले. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी संतुलित आहार आवश्यक असून, पालकांनी मुलांच्या योग्य आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांशी संवाद साधणे, मुलांच्या आवडीनिवडी जपताना त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रोटरीच्या पाठिंब्यामुळेच मुलांनी हे यश प्राप्त केले आहे, असे सांगून त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भक्ती करंबेळकर यांनी केले.