रत्नागिरी : नाचणे गावासाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिसची स्थापना करावी, यासह इतर मागण्या घेऊन माजी सरपंच संतोष सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोस्टाचे अधीक्षक ए. डी. सरंगले आणि सहायक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडे या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून नाचणे येथील पोस्ट ऑफिसचा कारभार सुधारण्याची आवश्यकता व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, नाचणे पोस्ट ऑफिसचा कारभार सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात नाचणे गावाला स्वतंत्र पोस्ट ऑफिस मिळावे यासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव मिळाल्यास जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान संतोष सावंत यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय चाचले, चंद्रकांत नार्वेकर आणि विजयकुमार ढेपसे हे उपस्थित होते.