GRAMIN SEARCH BANNER

सावर्डेच्या सह्याद्री विद्यालयाचा राज्यस्तरीय हॅकॅथॉनमध्ये डंका; ‘डोंगर वस्तीतील स्मार्ट शेती’ प्रतिकृतीला बहुमान

Gramin Varta
57 Views

सावर्डे: पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) आणि ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा ठसा उमटवला आहे. पर्यावरण संरक्षण या विषयांतर्गत सादर केलेल्या ‘डोंगर वस्तीतील स्मार्ट शेती’ या अभिनव प्रतिकृतीस राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी डोंगर वस्तीतील शेतीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक नफा कसा वाढवता येईल, याचे प्रभावी सादरीकरण केले. विशेषतः प्लॅस्टिकच्या कुंड्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आणि केळीच्या झाडाच्या खोडापासून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी पर्यावरणपूरक उपाय सुचवले आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील नवसर्जनाची वृत्ती आणि टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू तयार करण्याची कला दिसून आली. या यशाबद्दल आयोजकांतर्फे शाळेला लॅपटॉप, तर सहभागी विद्यार्थी मेहेर चव्हाण, ओंकार आग्रे, अर्णव निर्मळ व ओम तेटांबे यांना प्रमाणपत्र, मेडल, पुस्तके आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

MSCERT च्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ आणि लीडरशिप फॉर इक्विटीचे प्रभारी सीईओ सिद्धेश शर्मा यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना अविनाश पोतदार, श्रेया राजेशिर्के, संचिता कदम, दामिनी महाडिक, सिद्धेश जाधव व ज्ञानेश्वर भुवड या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

3198467
Share This Article