रत्नागिरी: कोकणातील सड्यांवर पावसाळ्यात निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणून बहरणाऱ्या ‘कोकण दिपकाडी’ या संकटग्रस्त वनस्पतीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आता जनमताचा कौल घेतला जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघामध्ये सल्लागार असलेल्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेने ‘अप-रोअर कॉन्झर्वेशन चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कोकण दिपकाडीची निवड केली आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष निधी दिला जाणार असल्याने, ही वनस्पती वाचवण्यासाठी वनस्पती संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
१६ ते १८ मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ‘दिपकाडी कोंकणेन्स’ या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रजातीला लोकसहभागातून बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिक भाषेत ‘एकदांडी’, ‘गौरीची फुलं’ किंवा ‘ढोकाची फुलं’ म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती केवळ महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या किनारपट्टीवरील सड्यांवर आढळते. उत्तरेकडे देवरुखपासून दक्षिणेकडे गोव्यातील मोपापर्यंत तिचा अधिवास मर्यादित असून रत्नागिरी, राजापूर, देवगड आणि वेंगुर्ला या तालुक्यांतील सुमारे ३० ठिकाणी तिचा बहर नोंदवण्यात आला आहे. या मर्यादित व्याप्तीमुळेच ‘आययूसीएन’च्या लाल यादीत तिला ‘संकटग्रस्त’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. या स्पर्धेच्या वनस्पती गटामध्ये जगभरातील १३ संकटग्रस्त वनस्पतींची नोंद करण्यात आली असून, त्यात कोकण दिपकाडीचा समावेश असणे ही अभिमानाची आणि तितकीच चिंतेची बाब मानली जात आहे.
जर या स्पर्धेत कोकण दिपकाडीला सर्वाधिक मते मिळाली, तर ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप’ला या प्रजातीच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठा निधी प्राप्त होईल. या निधीच्या माध्यमातून कोकणातील या दुर्मिळ प्रजातीवर सखोल काम करणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्याचे हे मतदान पूर्णपणे ऑनलाईन असून नागरिकांनी https://uproar.indianapoliszoo.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपले मत नोंदवावे, जेणेकरून कोकणच्या या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे सुलभ होईल. प्रदेशनिष्ठ असलेल्या या वनस्पतीचा अधिवास वाचवण्यासाठी आणि तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ एक मोठी संधी ठरत आहे.






