GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ : इटलीत प्रदूषणामुळे बंद पडलेली कंपनी लोटेत? कोकणात भीतीचे सावट

Gramin Varta
593 Views

कोकण बेचिराख करण्याचा प्रदूषण मंडळाचा डाव; अनेक महिने केवळ चौकशीचा फार्स

चिपळूण : इटलीत भीषण पर्यावरण प्रदूषणामुळे न्यायालयाने बंद केलेली रासायनिक कंपनी थेट रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनीने इटलीतील बंदी घालण्यात आलेल्या ‘मिटेनी एस.पी.ए.’ या कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरात आणल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट्स, व्हिडीओ आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.

‘मिटेनी एस.पी.ए.’ या इटालियन कंपनीवर पीएफएएससारख्या अतिशय घातक रसायनांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयीन कारवाईनंतर ती कंपनी तेथे बंद करण्यात आली. मात्र, त्याच कंपनीचे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री लक्ष्मी ऑरगॅनिक्सच्या एका उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरल्याचा दावा आता समोर येत आहे. या आरोपांना आंतरराष्ट्रीय माध्यमांतील वृत्तांनीही दुजोरा दिल्याने खळबळ उडाली आहे. गेले काही महिने प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ चौकशीच करत आहे. प्रत्यक्षात मात्र अहवाल आलेलाच नाही. त्यामुळे प्रदूषण मंडळाने कोकण बेचिराख होण्याचा विडा उचलला आहे की काय? असा संतप्त सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी कंपनी असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी पीएफएएससारखी रसायने तयार झाल्यास वाशिष्ठी नदी, भूजल आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला अटींसह परवानगी दिल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणासाठी जबाबदार ठरलेलीच यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याचा आरोप असल्याने या अटी प्रत्यक्षात अमलात आहेत का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

युरोपमध्ये नाकारले गेलेले प्रदूषक उद्योग विकसनशील देशांकडे वळत असल्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला असून, ‘लोटे हे अशा उद्योगांसाठी सुरक्षित ठिकाण बनत आहे का?’ असा संतप्त प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कंपनीने सध्या केवळ उत्पादन चाचण्या घेतल्याचा दावा केला असून, या चाचण्यांतून निर्माण झालेले टाकाऊ रसायन तळोजा येथे पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ४ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस बजावली आहे. हा अहवाल तज्ज्ञ समितीकडे पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर वाढणाऱ्या आरोपांनंतर अखेर लक्ष्मी ऑरगॅनिक्स कंपनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर आली आहे. मुंबई येथील मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक लोटेत दाखल झाले असून, कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, पेटंट्स आणि परवान्यांची सखोल तपासणी सुरू आहे. सत्य काय आणि अफवा काय, हे स्पष्ट होईपर्यंत ‘उद्योग की पर्यावरण?’ हा जळजळीत प्रश्न पुन्हा एकदा कोकणाच्या मनात घर करून बसला आहे.

उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यानी यावर प्रतिक्रिया देताना प्रदूषण मंडळाच्या सखोल चौकशीअंती कंपनी दोषी आढळल्यास कारवाई करू असे सांगितले आहे.

Total Visitor Counter

3072145
Share This Article