राजापूर : शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी दुपारी राजापुरात हळहळ व्यक्त करणारी घटना घडली. कुटुंबाचा आधारस्तंभ, घरचा एकुलता एक मुलगा आणि भाजपाचा शांत, संयमी, कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता तेजस शरद करंबेळकर (३२) यांची प्राणज्योत मावळल्याची वेदनादायक बातमी पसरताच परिसर शोकसागरात बुडाला.
काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने तेजसला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू होते… कुटुंबीयांच्या नजरेत आशेची छोटीशी ज्योत तेवत होती. मात्र नियतीने क्रूर वळण घेतलं आणि मंगळवारी सायंकाळी तेजसची जीवनयात्रा शांतपणे थांबली. त्या क्षणी आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली; संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला.
कर्तव्यदक्ष, मितभाषी, सर्वांना आपलंसं करणारा तेजस पक्षाच्या विविध उपक्रमांत नेहमी पुढे. न बोलता काम करणारा, कोणत्याही जबाबदारीत कसूर न करणारा… असा त्याचा स्वभाव. मुथुट फायनान्समध्ये काम करत असताना कुटुंबाचा भार शांतपणे पेलणारा तेजस अचानक निघून गेल्याने कुटुंबाला आधार देणारा हातच नाहीसा झाला आहे.
घरचा एकुलता एक कमवणारा मुलगा… त्याच्या जाण्याने आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्नांच्या पायवाटा विराण झाल्या. मागे आई, वडील, एक बहीण, काका-काकू, चुलत भाऊ असा आधारविरहित झालेला परिवार शोकाकुल आहे.
संपूर्ण साईनगरमध्ये हळहळ व्यक्त होत असून, “अजून एवढं काही करायचं होतं…” अशी प्रत्येकाचीच व्याकुळ प्रतिक्रिया आहे. तेजसच्या जाण्यानं एक घर नव्हे, तर एक संपूर्ण परिसरच पोकळ झाला आहे.
एकुलत्या एक कमावत्या मुलाच्या मृत्यूने राजापुरात हळहळ, करंबेळकर कुटुंब बुडाले शोकसागरात






