GRAMIN SEARCH BANNER

जयगड-हातखंबा मार्गावर डंपर वाहतूक रोखली

Gramin Varta
775 Views

अवजड डंपर वाहतुकीच्या विरोधात ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते हातखंबा या महत्त्वाच्या मार्गावर कंपन्यांमधून होणाऱ्या अवजड डंपर वाहतुकीच्या बेदरकारपणामुळे वाढलेल्या अपघातांविरोधात खंडाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव गमावण्याची वेळ येत असल्याचा संतप्त आरोप करत, जोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला. अखेर प्रशासनाकडून दोन दिवसांची मुदत मिळाल्यानंतर सायंकाळी उशिरा हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून जयगड परिसरातील उद्योगांमुळे या रस्त्यावरील मालवाहतुकीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषतः, गेल्या दहा वर्षांत वाहतुकीची व्याप्ती वाढूनही रस्त्याची क्षमता आणि स्थिती तीच राहिली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेणारे डंपर, रस्त्यांची दुरवस्था आणि चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महिनाभरात किमान एका निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागतो, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

नुकताच हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. याच घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली. अनेकदा बंद पडलेले डंपर रस्त्यात उभे राहिल्याने वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

जीव गेला तर पंचनामे करायला या!’ – प्रशासनाला थेट इशारा

यापूर्वी अनेकदा निवेदन देऊनही अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने मंगळवारी दुपारनंतर जयगड-वाटद मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी कठोर भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेचे बळी जात आहेत. अशाप्रकारे बेबंद अवजड वाहने चालणार असतील तर आम्ही या गाड्या जाऊ देणार नाही. प्रशासनाने कारवाई तात्पुरती न करता, ती कायमस्वरूपी करावी.” आपला संताप व्यक्त करताना गावणकर यांनी, “आम्ही मेलो की, पंचनामे करायला यावे,” असे थेट बोल प्रशासनाला सुनावले.
खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्था आणि सहभागी ग्रामस्थांनी यावेळी डंपर वाहतूक रोखून धरली.

या आंदोलनादरम्यान त्यांनी डंपरव्यतिरिक्त इतर वाहनांच्या वाहतुकीला कोणताही अडथळा केला नाही, साऱ्या ग्रामस्थांनी शांतपणे रस्त्याच्या बाजूला ठिय्या दिला होता. रोखलेल्या डंपरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या वाहतुकीसंदर्भात आरटीओ प्रशासनाशीही आंदोलकांकडून फोनवरून संपर्क साधण्यात आला. प्रशासनाकडून दोन दिवसांत यासंदर्भात दाद मागण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, पुढील कारवाईच्या प्रतीक्षेसाठी हे तीव्र आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.

Total Visitor Counter

3073126
Share This Article