GRAMIN SEARCH BANNER

दुहेरी खून प्रकरणातील साक्षीदाराचा काटा काढला; अपहरण करून कर्नाटकात खून

कवठेमहांकाळ: जत तालुक्यातील कोसारी येथील बहुचर्चित दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर (वय ५०) यांचा अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयितांनी हा खून केल्यानंतर तो आत्महत्येचा प्रकार भासावा या उद्देशाने मृतदेह कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यात एका झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला होता. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी दादासाहेब यमगर हे पेट्रोल भरून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतलेच नाहीत. त्यांची दुचाकी अज्ञात व्यक्तींनी नेल्याचे समोर आले आणि त्यांचा मोबाईलही बंद लागल्याने नातेवाईकांनी अपहरणाची भीती व्यक्त केली होती. दरम्यान, बुधवारी अथणी तालुक्यातील मदभावी परिसरातील एका शेतात त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अथणी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

दादासाहेब यमगर हे कोसारी दुहेरी खून खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार होते. न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असतानाच त्यांचा काटा काढण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. डीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ज्ञानू खोत याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून ज्ञानू खोत, रोहित पाटोळे आणि हर्षद पैलवान या तिघांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन संशयित अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जुन्या खून खटल्यात साक्ष देऊ नये यासाठी सुपारी देऊन हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3483798
Share This Article