लांजा : येथील नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक रफिक उर्फ गुल्ल्या नेवरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
रफिक नेवरेकर हे लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मधून सन २०२० आणि २०२५ अशा सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०२० ते २०२५ या कार्यकाळात त्यांनी प्रभागात राबवलेल्या विविध विकासकामांमुळे, नागरिकांशी ठेवलेल्या सततच्या संपर्कामुळे तसेच कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे त्यांना नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळाला. याच कामाची पावती देत यंदाच्या निवडणुकीत त्यांनी सव्वाशे मतांच्या मताधिक्याने एकहाती विजय मिळवला.
विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झालेले रफिक नेवरेकर यावेळी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पक्षाशिवाय निवडणूक लढवूनही त्यांनी तेवढ्याच मताधिक्याने विजय मिळवल्याने प्रभागातील नागरिकांशी असलेला त्यांचा विश्वासार्ह व मजबूत जनसंपर्क पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर रफिक नेवरेकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखालील लांजा–कुवे नगरपंचायतीच्या शिवसेना शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
या निवडीबाबत बोलताना रफिक नेवरेकर म्हणाले की, आतापर्यंत नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागापुरते काम करत होतो. मात्र आता पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचा सभापती म्हणून लांजा–कुवे नगरपंचायत हद्दीतील सर्व १७ प्रभागांतील नागरिकांचे पाणीविषयक प्रश्न प्रामाणिकपणे व प्रभावीपणे सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. आमदार किरण सामंत यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तसेच जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी या पदावर पोहोचलो असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी मतदारांचे आभार मानले.







