रत्नागिरीच्या फलक टेमकरचा जागतिक विक्रम; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी:  जिद्द आणि चिकाटी असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही, हे रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलची अवघ्या पाच वर्षांची विद्यार्थिनी कु. फलक मुझम्मील टेमकर हिने सिद्ध करून दाखवले आहे. फलकने ३ मिनिटांत सर्वाधिक हुला हूप फिरवण्याचा अधिकृत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रस्थापित करून जागतिक स्तरावर इतिहास रचला आहे. तिच्या या विलक्षण यशामुळे केवळ रत्नागिरीचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल झाले असून, १० एप्रिल २०२६ रोजी तिच्या या विक्रमाला अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या फलकला लहान वयातच स्वतःहून हुला हूपिंगची आवड निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे. सुमारे तीन महिन्यांच्या खडतर मेहनतीनंतर तिने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी हा विक्रम प्रस्थापित केला होता. या विक्रमासाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ज्याची सर्व तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता जागतिक स्तरावर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

फलकचे हे यश तिच्या अखंड मेहनतीचा, समर्पणाचा आणि अदम्य आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना मानले जात आहे. जिद्द असेल तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही, हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले असून ती आज देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. फलकच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून तिचे कौतुक होत असून तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. फलकच्या या यशामुळे रत्नागिरीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *