खेड: सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकालाची मोहोर उमटवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत तालुक्यात शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालात शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे.
प्रशालेत कु. स्वरा महाडिक हिने ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला. त्याखालोखाल कु. गार्गी आग्रे, कु. अवनिश जगताप आणि कु. श्राव्य निकम यांनी प्रत्येकी ९८ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक विभागून घेतला. तसेच ९७.८० टक्के गुणांसह कु. आर्या खेडेकर आणि कु. अनिश मणकापुरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. केवळ एकूण टक्केवारीच नव्हे, तर वैयक्तिक विषयांमध्येही विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. यामध्ये आय.टी. विषयात २० विद्यार्थी, मराठीत ९ विद्यार्थी, कला विषयात ४ आणि संस्कृतमध्ये एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवून पैकीच्या पैकी गुणांचा टप्पा ओलांडला आहे.
शाळेचा निकाल गुणवत्तेच्या बाबतीत अत्यंत वरच्या श्रेणीत राहिला असून, ३२ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अनुष्का वारे, ओम सुर्वे, आर्या दळवी, वेद कालेकर, स्नेहा दिवेकर यांच्यासह इतर गुणवंतांचा समावेश आहे. एकूण ३८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक, तर ४९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







