रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून विनातिकीट आणि अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, केवळ सरत्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल ९३४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमेदरम्यान ३७ हजार विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणारी प्रकरणे उघडकीस आली असून, अशा प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २ कोटी ९० लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने सातत्य राखत एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमांचे आयोजन केले होते. या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण मार्गावर तब्बल ४ लाख ९९ हजार ६७५ अनधिकृत प्रवासी आढळले. या सर्व प्रवाशांवर कडक कारवाई करत रेल्वेने रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात एकूण २७ कोटी ६८ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. रेल्वेच्या या आक्रमक भूमिकेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. हाच वाढता प्रतिसाद पाहता, आगामी काळात संपूर्ण मार्गावर ही तिकीट तपासणी मोहीम अधिक व्यापक आणि तीव्र केली जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष पथक संयुक्तपणे कार्यरत राहणार आहे. प्रामाणिक आणि वैध तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि आरामदायी व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी सांगितले आहे. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रेल्वेच्या ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे मोबाईल ॲप डाऊनलोड करावे, अशी माहितीही या प्रसिद्धीपत्रकात (62073.jpg) देण्यात आली आहे.





