दापोली : तालुक्यातील बुरोंडी महामाई नगर येथे एका वृद्ध दाम्पत्याचे अवघ्या दोन तासांच्या अंतराने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गोविंद बाळाजी साठे (वय ९६) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी गोविंद साठे (वय ९०) यांनी २२ मे रोजी एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोविंद साठे हे कष्टाळू, दानशूर आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होते. त्यांच्या पत्नी लक्ष्मी साठे याही शांत, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल म्हणून ओळखल्या जात होत्या. आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ देत संसार केलेल्या या दाम्पत्याची अखेरची साथही कायम राहिली.
२२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी साठे यांचे निधन झाले. पत्नीच्या निधनाचा मोठा धक्का गोविंद साठे यांना बसला. पत्नीच्या जाण्याचे दुःख सहन न झाल्याने अवघ्या दोन तासांत म्हणजे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनीही प्राण सोडले. त्यामुळे संपूर्ण साठे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे बुरोंडी परिसरातील नागरिकही भावूक झाले असून वृद्ध दाम्पत्याच्या प्रेमळ सहजीवनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दापोली: पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने दोन तासांत पतीचाही मृत्यू; बुरोंडीतील वृद्ध दाम्पत्याच्या निधनाने हळहळ





