GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात पाणी कपातीची शक्यता, नगरपरिषदेचे नागरिकांना काटकसरीचे आवाहन

राजापूर:कोदवली धरणातील खालावलेली पाणीपातळी आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे राजापूर शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे धरणातील साठा मर्यादित होत असतानाच तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा येणार असल्याची शक्यता राजापूर नगरपरिषदेने वर्तवली आहे.

शहराला शिळ येथील जॅकवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, मात्र महावितरणकडून सध्या सुरू असलेल्या भारनियमनाचा मोठा फटका पाणीपुरवठा यंत्रणेला बसत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी साठवणुकीच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत, परिणामी शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरपरिषदेने या संदर्भात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून, कोणत्याही नागरिकाने थेट नळजोडणीला पंप लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करून पंप लावल्याचे आढळल्यास संबंधित नळजोडणी कायमस्वरूपी खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पाणीपुरवठा यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी दर शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3412918
Share This Article