संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चोरीचे सत्र सुरूच आहे. करंजारी येथे बंद असलेल्या एका शिक्षकाचा बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या ऐवजात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजारी येथील सेवानिवृत्त शिक्षक मधुसूदन शिवराम भुर्के यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भुर्के कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. मंगळवारी ते पुन्हा घरी परतले असता, त्यांच्या बंगल्यामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी बंगल्याचा मागील दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारून तो ऐवज लंपास केला, असे भुर्के यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला. यामध्ये सुमारे १२ लाख रुपये किमतीचे दागिने गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. भर वस्तीत ही घरफोडी झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
चोरट्यांचे सत्र रोखणे पोलिसांसमोर आव्हान
साडवली, कोसुंब, करंबेळे येथे झालेल्या घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच, चोरट्यांनी आपला मोर्चा आता करंजारी गावाकडे वळवला आहे. चोरीचे प्रकार रोखणे आणि चोरट्यांचा छडा लावणे, हे पोलीस यंत्रणेसमोर एकप्रकारे आव्हान बनले आहे. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लॉकर्समध्ये ठेवावी, तसेच बंगल्यासमोर आणि मुख्य मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारावी, असे आवाहन केले आहे.





