लातूर: पत्रकारांच्या सुरक्षेसह त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्य, पारदर्शकता आणि लोकहित जपत पत्रकार सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अधिवेशनाचे उद्घाटन दैनिक लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात पत्रकार, संपादक आणि विचारवंतांच्या उपस्थितीत पत्रकारितेसमोरील आव्हाने, बदलते तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारांचे हक्क व जबाबदाऱ्या यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही पत्रकार परिषद हे व्यासपीठ केवळ पत्रकारांच्या प्रश्नांसाठीच नव्हे, तर लोकशाही मूल्यांना बळकटी देणारे असल्याचे मत व्यक्त केले.





