रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथील आंबा बागेत लागलेल्या भीषण वणव्यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवार 11 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. भरत दिगंबर धारगळकर (५५, मूळ रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग; सध्या रा. नाखरे, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. या भयावह घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले भरत धारगळकर हे बागेचे मालक राजन वैद्य यांच्या पत्नीचे सख्खे भाऊ आहेत.
रामेश्वरवाडी येथील वैद्य यांच्या मालकीच्या आंबा बागेत फवारणीचे काम सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास बागेच्या बाहेरील बाजूला अचानक आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे ही आग क्षणातच भडकत बागेच्या दिशेने वेगाने सरकू लागली. आगीमुळे बागेचा फडशा पडू नये, या उद्देशाने भरत धारगळकर यांनी प्राणाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली.
मात्र, आगीच्या भीषण ज्वाळा आणि दाट धुराच्या विळख्यात ते अडकले. आगीच्या तीव्रतेमुळे ते गंभीररीत्या भाजले गेले, तर धुरामुळे गुदमरून ते जागीच कोसळले. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग विझवण्याचा प्रयत्न करताना एका कष्टकरी कामगाराने आपला जीव गमावल्याने रामेश्वरवाडी परिसर शोकसागरात बुडाला आहे.







