पाली : रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले असताना पालीतील डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यातील सीमेवरील जवानांसाठी शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या हातांनी राख्या व शुभेच्छापत्र तयार केली व ती पोस्टाद्वारे भारतीय सैन्य दलाकडे पाठवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या घराची उब मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वार्षिक उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सहानुभूतीची भावना वाढवणारा ठरतो.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील सहशिक्षिका ऋतुजा महाकाळ यांनी मार्गदर्शन केले. निष्ठेने व प्रेमाने तयार केलेल्या राख्या आज शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद धाडवे तसेच पाली पोस्टमास्टर सुनील कुरतडकर व पोस्टमन विजय सुकम यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टल सर्विस द्वारे भारतीय सैन्यदलाद्वारे सैनिकांपर्यंत पाठवण्यात आल्या आहेत.चिमुकल्या हातानी केलेला हा प्रयत्न आपल्या शूर जवानांना खूप आनंद देईल व त्यांचे मनोधैर्य वाढवेल असा विश्वास उपस्थित पालकांनी व्यक्त केला.
सामंत इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांकडून जवानांसाठी राख्या
