खेड: शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ आपली सेवा बजावलेले खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर यांचा सेवापूर्ती सोहळा मिर्ले शाळा नंबर १ मध्ये नुकताच उत्साहात संपन्न झाला. तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वरेकर यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर बीट मुख्याध्यापक संजय हिंगावार, सेवानिवृत्त शिक्षक अजित भोसले, शिरगाव शाळा नंबर १ चे मुख्याध्यापक दत्ताराम चव्हाण, बिजघर शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, सुनील वरेकर यांच्या पत्नी स्नेहल वरेकर आणि सुकन्या ॲडव्होकेट गायत्री वरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे औचित्य साधून संजय जाधव आणि संदीप फागे यांना मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
रमेश कदम यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. हा सेवापूर्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी माधवी भोसले, विजयकुमार भिसे, शैलेश पराडकर, शशिकांत भुवड, संदीप घाणेकर, तृप्ती काताळे, अंकिता भोसले आणि सरला मावळी यांनी विशेष मेहनत घेतली. उपस्थित मान्यवरांनी वरेकर यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.






