रत्नागिरी: शहरातील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी शहर पोलिसांनी कोकण नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६६ हजार रुपये किमतीच्या ५.५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थासह एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. जे.के. फाईल, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना कोकण नगर येथील साईभूमी नगर अपार्टमेंटच्या मागील बाजूस हा तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळला.
पोलिसांच्या पथकाने त्याची अधिक चौकशी व झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले खाकी रंगाचे ब्राऊन हेरॉईन आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ६६ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ आणि तो ठेवण्यासाठी वापरलेली प्लास्टिक पिशवी असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि त्यांच्या पथकातील शरद शंकर जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी केली.
आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) १९८५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी नागरिकांना अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.





