देवरुख : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी भूगोलशास्त्राचे अभ्यासक व अध्यापक प्रा. मयुरेश राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाप्रसंगी प्रा.सीमा शेट्ये, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. अभिनय पातेरे उपस्थित होते. आपल्या भाषणात प्रा. राणे यांनी जागतिक लोकसंख्या वाढीच्या समस्यांवर प्रकाश टाकताना त्याची गंभीरता अनेक मुद्द्यांनी स्पष्ट केली, लोकसंख्येच्या नियंत्रित वाढीचे फायदे आणि त्याचे समाजावर व पर्यावरणावर होणारे अनुकूल परिणाम, तसेच लोकसंख्या रोखण्यासाठीच्या जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्र निर्मितीत तरुणाईचा असणारा महत्त्वपूर्ण सहभाग, शहरी लोकसंख्या वाढीचे आव्हान व निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या, याचबरोबर शिक्षण, आरोग्यसेवा व शाश्वत विकासासाठी लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व विशद केले. शिक्षित समाज आणि नियोजित कुटुंब यामुळे समृद्ध भविष्य घडेल, असे आशादायक प्रतिपादन याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी केले. प्रा. धनंजय दळवी यांनी यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना “तरुणांना निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम बनवणे” याविषयीची सविस्तर माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रसिद्धी विभागाच्यावतीने प्रा. दळवी यांनी लोकसंख्या वाढीच्या गंभीर समस्या प्रतीत करणारी भित्तीचित्रे दाखवून माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर लोकसंख्या वाढीच्या समस्यांबाबत व राष्ट्र निर्मितीमध्ये तरुणाईचा असणारा महत्त्वपूर्ण सहभाग याबाबतची माहिती पाठवण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी अपूर्वा भोसले(१२वी कला) हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सीमा कोरे, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.