खेड: आपल्या कर्तृत्वाने सातासमुद्रापार यशाची नवी गाथा लिहिणाऱ्या कोकणातील एका लेकीने अमेरिकेत मोठा सन्मान पटकावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चिंचवली गावाच्या शमा केसकर (विवाहपूर्व नाव शमा बुटाला) यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘द टॉप वुमन लीडर्स ऑफ इयर २०२५’ या किताबाने गौरवण्यात आले आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला ठरल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्या तरी, शमा यांची नाळ आजही आपल्या कोकणाशी घट्ट जोडलेली आहे. त्यांचे कुटुंब मुंबईतील अंबरनाथ येथे वास्तव्यास असून, शमा यांनी आपले संपूर्ण शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी अमेरिकेत ‘मास्टर्स इन कम्युनिकेशन’ ही पदवी संपादन केली.अमेरिकेतील विविध आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत त्यांनी आपला ठसा उमटवला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या शमा केसकर अमेरिकेतील एका ‘स्टेल्थ एआय स्टार्ट-अप’ कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या लक्षणीय कार्याची दखल अमेरिकेने घेतली असून, त्यांना यंदाचा ‘द टॉप वुमन लीडर्स ऑफ इयर २०२५’ हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोकणातील एका छोट्या गावातून निघालेल्या या लेकीने आपल्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने जागतिक स्तरावर मिळवलेले हे यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.