GRAMIN SEARCH BANNER

महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर: भारत-पाकिस्तान एकाच गटात

Gramin Search
6 Views

दिल्ली: २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच जाहीर केले आहे. १२ जून ते ५ जुलैदरम्यान रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश एकाच गटात, म्हणजेच ‘अ’ गटात करण्यात आला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना सुरुवातीपासूनच हायव्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय संघाचा सलामीचा सामना १४ जून रोजी एजबॅस्टन येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघाला २१ जून रोजी हेडिंग्ले येथे दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ‘अ’ गटातील भारतीय संघाची सर्वात मोठी लढत २८ जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशिवाय आणखी दोन पात्रता फेरीतून येणारे संघ सहभागी होणार आहेत. भारताचे १७ जून आणि २५ जून रोजी होणारे सामने याच पात्र ठरलेल्या संघांविरुद्ध असतील.
या विश्वचषकाची उपांत्य फेरीचे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी द ओव्हल मैदानावर खेळवले जातील. तर, महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर ५ जुलै रोजी रंगणार आहे. महिला क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या वेळापत्रकामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

2652220
Share This Article