GRAMIN SEARCH BANNER

लाचखोरी भोवली! जिल्हा परिषदेचा ‘तो’ सहायक लेखा अधिकारी निलंबित

Gramin Varta
257 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कार्यरत असलेले सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने मंगळवारी निलंबनाची कारवाई केली आहे. लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित मुद्दे वगळण्याकामी लाच स्वीकारताना 11 सप्टेंबर रोजी शेट्ये यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते.

दापोली पंचायत समितीच्या सहायक लेखा अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर सहायक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात, कंत्राटी शिपाई सतेज घवाळीने तक्रारदाराकडून 16 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली.

शिपाई घवाळीने लाचेची ती रक्कम तत्काळ जिल्हा परिषदेचे सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केली. याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले. या लाचखोरीच्या गंभीर घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सिद्धार्थ शेट्ये यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

2647377
Share This Article