GRAMIN SEARCH BANNER

खेड-दापोली मार्गावर टाटा मॅजिक – स्विफ्ट डिझायर अपघातात एक जखमी

खेड : खेड-दापोली मार्गावर फुरुस गावाजवळ सुखदर फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडीचे मोठे नुकसान झाले असून, गाडीचालक जखमी झाला आहे. हा अपघात १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता घडला. भरधाव वेगात आलेल्या टाटा मॅजिक गाडीने समोरून चुकीच्या बाजूने येऊन धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

याप्रकरणी जखमी चालक अनिकेत मुरलीधर भंडारी (वय ३५, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी अनिकेत भंडारी हे त्यांच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच १७ बीव्ही ५७८९) गाडीने मुंबईहून दापोलीकडे जात होते. मौजे फुरुस येथील सुखदर फाट्याजवळ मोरीवर पोहोचले असता, समोरून उतारावरून येणाऱ्या टाटा मॅजिक (एमएच ०८ झेड २२९८) गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात अनिकेत भंडारी यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना दुखापतही झाली आहे. टाटा मॅजिक गाडीचा चालक सागर आनंद नलावडे (रा. महात्मा फुले नगर, खेड) हा या अपघातास जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2475146
Share This Article