जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नावडी अमृता ग्रुपचा अंतरा फाउंडेशनतर्फे सन्मान

Gramin Varta
291 Views

संगमेश्वर (दिनेश आंब्रे) : रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीराम मंदिर येथे आयोजित जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धेत शहरी विभागातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील अमृता ग्रुपच्या महिलांचा अंतरा फाउंडेशन, रत्नागिरी-आंबेड बु., ता. संगमेश्वर यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

नावडी येथील अमृता ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक मंगळागौर नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करत जिल्हास्तरीय स्पर्धेत शहरी विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत अंतरा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला सदस्यांनी अमृता ग्रुपच्या महिलांची भेट घेऊन त्यांना भेटवस्तू देत सन्मानित केले.

यावेळी अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा नुपुराताई मुळे, खजिनदार उन्मेष मुळे, उपाध्यक्षा सरिता आंबेकर, तसेच सुमन झगडे, रोहिणी सुर्वे आणि प्रियांका साळवी यांची उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अंतरा फाउंडेशनचे खजिनदार उन्मेष मुळे यांनी सांगितले की, पारंपरिक कला आणि नृत्याचे मोठ्या स्तरावर सादरीकरण करताना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तबला, पेटी तसेच इतर वाद्यांसाठी खर्च येतो. अमृता ग्रुपच्या महिलांनी मिळविलेले यश लक्षात घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस हातभार लागावा या उद्देशाने वाद्यांसाठी आवश्यक असणारी रक्कम भेट म्हणून देण्यात आली.

अमृता ग्रुपच्या महिलांना भविष्यातही आवश्यक ते सहकार्य वेळोवेळी करण्यात येईल, असेही उन्मेष मुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू व इतर बाबींसाठीही सहकार्य करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अंतरा फाउंडेशनच्या अध्यक्षा नुपुराताई मुळे तसेच उपस्थित महिला सदस्यांनी दिली.

दरम्यान, साप्ताहिक पोलीस तपासचे पत्रकार दीपक तुळसणकर यांनीही अमृता ग्रुपच्या प्रमुख अर्चिता कोकाटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी ग्रुपमधील मुलांना ‘हसती दुनिया’ हे गोष्टीचे पुस्तक भेट देत त्यांचेही कौतुक केले.

अमृता ग्रुपच्या प्रमुख अर्चिता कोकाटे यांनी अंतरा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच पत्रकार दीपक तुळसणकर यांनी केलेल्या कौतुक व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक कला-संस्कृतीचे जतन करत जिल्हास्तरावर मिळविलेले हे यश कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना आणि पारंपरिक लोककलेला निश्चितच प्रोत्साहन मिळत आहे.

Total Visitors :
4784307
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *