रत्नागिरी: भविष्य उज्ज्वल होण्याकरिता आवश्यक उद्योजकता कौशल्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विकसित करावीत, असे आवाहन योजक फूड्स अँड बेवरेजेसचे संचालक श्रीकांत भिडे यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर (डीजीके) कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित कॉमर्स डे कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. भिडे यांनी शून्यातून व्यवसायाची सुरुवात कशी करावी, याबद्दल माहिती दिली. व्यवसायाच्या व्यवस्थापनाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील तरुणांनी व्यवसायामध्ये पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. आपल्याला व्यवसायचे बाळकडू वडील स्व. नाना भिडे यांच्याकडून मिळाले, असे त्यांनी सांगितले. डोअर टू डोअर या पद्धतीचा अवलंब करून त्यांनी कशा प्रकारे उत्पादनांचे मार्केटिंग केले याचा अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थी या सत्रामध्ये सहभागी झाले. या वेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख राखी साळगावकर, इतर प्राध्यापक आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी उद्योजकता कौशल्ये शिकून घ्यावीत – श्रीकांत भिडे
