संगमेश्वर: तालुक्यातील डिंगणी कुरण बागवाडी येथे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत जाब विचारल्याच्या रागातून उपसरपंचासह सात जणांनी एका शेळीपालक व्यक्तीला घरात घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. मारहाणीत फिर्यादीच्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली असून, जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी उपसरपंचासह दोन नामनिर्देशित आणि पाच अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक गोविंद राऊत (वय ५२, व्यवसाय शेळीपालन, रा. डिंगणी कुरण बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ मिथुन मनोहर निकम (रा. डिंगणी चाळकेवाडी) हा गावचा उपसरपंच आहे. गावात आलेल्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘वसुंधरा पाणलोट योजने’च्या निधीमध्ये उपसरपंचाने अफरातफर केल्याची माहिती फिर्यादीला मिळाली होती.
याच कारणामुळे फिर्यादी दीपक राऊत यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी मिथुन निकम याला फोन करून आगामी ग्रामपंचायतीच्या सभेत ‘जलजीवन मिशन’ आणि ‘वसुंधरा पाणलोट योजने’साठी आलेल्या निधीचा हिशोब द्यावा, असे सांगितले होते. या गोष्टीचा राग मनात धरून उपसरपंच मिथुन निकम याने स्वप्निल सुर्वे (रा. कोंड आंबेड) आणि अन्य पाच अनोळखी आरोपींसह मिळून १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता फिर्यादीच्या घरात (हॉलमध्ये) जबरदस्तीने प्रवेश केला.
घरात घुसताच आरोपींनी फिर्यादीला, “येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सरपंच पदासाठी कसा उभा राहतोस ते बघतोच आणि तू आमचे काय भांडे उघडे करतोस ते बघून घेतोच,” असे धमकावले. त्यानंतर त्या सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताचे थापटे तसेच लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी सौ. शिला राऊत मध्यस्थी करण्यास गेल्या असता, आरोपींनी त्यांनाही हाताचे थापटाने मारहाण केली आणि “तुम्हा तिघांना ठार मारून टाकू,” अशी गंभीर धमकी दिली.
या घटनेनंतर दीपक राऊत यांनी संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून रात्री १०.३२ वाजता फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून उपसरपंच मिथुन मनोहर निकम (याचेवर यापूर्वीही ३५३, ३३२ कलमांखाली गुन्हा दाखल होता, परंतु कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती), स्वप्निल सुर्वे व अन्य पाच अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
संगमेश्वर : ‘जलजीवन मिशन’च्या निधीचा हिशोब विचारल्याच्या रागातून उपसरपंचासह 7 जणांनी एकाला घरात घुसून केली मारहाण, तालुक्यात खळबळ
